निग्रह करुनी ज्ञानिया वाचला
गर्वांधार साचला तरी मनी !
मुखोद्गत केले नाम्याचे अभंग
स्वार्थ भांग नाही उतरला!
नाथाच्याभारुडी तल्लीन जाहलो
नाठाळ गारुडी पुंगी फुंकी!
तुकोबाची वाणी जिव्हाखेळविते
जिव्हारी लागते शिवीमाझी!
जनाईची ओवी जात्यावरी गाय
जातीवरी जाय समयीस!
बहिणाईने कुठे वाचली अक्षरे ?
मतीच्या मातीस साक्षरले!
वाचाल वाचाल शब्द अर्थाविना
क्रियेवीण वाचाल ते व्यर्थ आहे !
राजेश देशपांडे [२३/०४/२१] rjsh.deshpande@gmail.com