• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

VAJANI WADH HOTA / वजनी वाढ होता …. ( विनोदी कथा )

Bywachankatta

Apr 28, 2021

 मंगळागौरीचे खेळ खेळता खेळता माझी चांगलीच दमछाक झाली. अंगाची हालचाल करण्याची सवय नाही, उठाबशा काढण्याची सवय त्याहून नाही. पायात गोळे यायला लागले, कांजीवरम साडीचा सिल्क चा ब्लाउज , जो मी साडी दोन तीन वेळा नेसल्यानंतरच ड्राय क्लिनिंग ला देणार होते, तो ही घामाने पार चिंब भिजलाच .तितक्यात  गोखलेंच्या शलाकाने उखाणा घेतला, 
“ चंद्र वाढतो कलेकलेने , आपटेकाकू वाढतात किलोकिलोने. “ आणि फिदीफिदी हसली  टवळी. इतक वाईट वाटलं सांगू, मनाला घरं  पडली अगदी..तोंडाची चवच गेली. जेवणारच नव्हते खरंतर..पण नेमकी मेली जेवणात सीताफळ बासुंदी. आता सीताफळ बासुंदी काय आपण रोज रोज करतो का? ढकलली झालं कशीबशी घश्याखाली. उद्यापासून डाएटिंग नक्की करायचं आणि कोपऱ्यावरच्या जिम ला पण नक्की जायचं असा विचार करतच डेझर्ट काउंटर  कडे वळले. शेलाट्या निलूने माझ्या प्लेट कडे पाहून मैत्रिणीला डोळा मारला. मी तिच्याकडे  मुळीच लक्ष न देता प्लेट मधलं चीज केक, जिलबी नि रबडी यांची एकमेकांत युती होणार नाही याची काळजी करत , प्लेट चा आणि माझा तोल सावरत होते.  काही म्हणा  , लोकं म्हणोत स्लिम, पण निलू अजिबात चांगली दिसत नाही. खप्पड गालफडं  , पाठ पोट सपाट, डोळे खोल गेलेले. माझी आई  म्हणायची, ” बाईच्या जातीला कसं जे ते जिथल्या तिथे हवं.” हसू देत हसली तर, जळकुटी मेली.स्वतःचं ठेवते झाकून  आणि दुसऱ्याच पाहते वाकून.
         दुसऱ्या दिवशी उठले तीच मुळी चालायला जायचा निश्चय करून. आधी टी शर्ट शोधला, एक टी शर्ट होईना, पॅंट  ने तर पायात वर सरकायलाच नकार दिला. पंजाबी ड्रेस घालून वॉक ला जात का कुणी, म्हणून पंजाबी नाही घातला. हे म्हणाले , अगं , माझा शर्ट , पॅंट  घाल. शी ..काहीतरीच. नाही म्हणायला डोक्याला लावायचा हेयरबॅंड  सापडला लेकीचा. किती स्टायलिश दिसत होते मी तो लावून..पण योग्य कपडे शोधता शोधता सूर्य हातभर डोक्यावर आला आणि माझा वॉक ला जायचा उत्साह मावळतीच्या वाटेला लागला.
        तेवढ्यात लेकीने आठवण करून दिली, “ आई, अगं  आजपासून डाएट आहे न तुझं ? “ माझ्या कालच्या घोषणा लक्ष्यात ठेवल्यान्
वाटतं लगेच…रोज ही  माऊली इथे घसा फोडून ओरडत असते,  ‘अरे, मला ई मेल करायला शिकवा, फेसबुक वर अकौंट काढून द्या, तेव्हा कानात चाकं घालून बसतात .  मी पण हल्ला परतवला, “ अग, आज उपासच आहे माझा, वेगळ डाएट काय करायचं ते ? “ लेकीने लगेच साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा हा सर्व औपासिक परीवार कसा कॅलरीनी संपृक्त आहे याचं आख्यान लावलं. इतका राग आला न कार्टीचा ..दिवसरात्र पिझा नि बर्गर हादडत असते, जरा म्हणून आई विषयी दयामाया नाही. जाऊ दे  आपलाच दाम खोटा. मी एकवेळ फराळाचं   खाऊन रात्री देवाला नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक केले. आता प्रसाद खाल्ला नाही तर उपासाचं  पुण्य पदरी कसं पडेल म्हणून खाल्ले झालं निमूट.
       दुसऱ्या दिवशी जरा बरासा टी शर्ट , पॅंट  घालून तयार झाले , बूट चांगले नाहीत म्हणून घरीच थांबणार होते , पण ह्यांनी ढकललं जिम कडे.जिम मधल्या चार दोन घाटदार मुली पाहून काळजात कुठेतरी कळ गेली. तितक्यात एका बलदंड मुलाने माझा ताबा घेतला. बलवान , पीळदार दंड ज्याचे , असा तो…बलदंड….मी लगेच व्युत्पत्ती मनात जुळवली. त्याने अस्मादिकांना ट्रेड मिल नामक यंत्रावर उभं केलं . काहीतरी सूचना दिल्या, पण मी आरश्यातून जिकडे तिकडे माझ्या शरीरावर असलेल्या वळ्या मोजण्यात गर्क होते. आणि अचानक माझ्या पायाखालची ट्रेड मिल ची जमीन निसटायला लागली. मला कुठेतरी दौडवत नेणारा हा पट्टा थांबवायचा कसा, हे न कळल्याने भेदरून किंकाळी फोडली. बिचारा बलदंड, जो कौतुकाने स्वतःचे स्नायू आरश्यात बघण्यात मग्न होता, त्याने मागून माझ्या यंत्रावर उडी मारली,  तो सरकपट्टा थांबवला  आणि मी पडता पडता , मरता मरता वाचले. नंतर मला सायकल वर बसवण्यात आले. बलदंड काही मला सोडायला तयार नव्हता. त्या सायकलला पाय मारून माझ्या पायात पेटके यायला लागले. बलदंडचा डोळा चुकवून मी त्यावरूनही खाली उतरले. एक व्यायाम त्यातल्या  त्यात  सोपा वाटला. एका लोखंडी चकतीवर उभं राहून एकदा इकडे आणि एकदा तिकडे असं फिरायचं. फारसे कष्ट नसलेला हा व्यायाम मला आवडला. पण अवतीभोवती दिसणारी डम्बेल नावाची आयुधं, जीवनातून कधीच हद्दपार झालेल्या दोरीच्या उड्या  या साऱ्या प्रकाराची धास्ती घेऊन मी पुढचे व्यायाम न करताच सुंबाल्या केला.
       पण घरातले हार मानायला तयार नव्हते म्हणून  माझा प्रवेश योगासनांच्या क्लास मध्ये झाला. भल्या पहाटे उठायला लागलं होत. त्यातून पोट रिकामं  ठेवून यायचं असल्याने सकाळच्या  घोटभर चहाचं आचमन ही केलेलं नव्हत. योगा बाईंनी मला  प्राणायाम शिकवला. माझा श्वास काही माझं ऐकायला तयार नव्हता.तो शिक्षकांनी सांगितलेल्या विरूध्द नाकपुडीतूनच प्रवास करत होता.
एकदाचं फास्स फुस्स करून मी हुश्श करते न करते तोच योगा बाईंनी  वज्रासनात  बसायला सांगितलं. आता आली का पंचाईत ? इथे खाली बसता येण्याची मारामारी , तर वज्रासन कोण घालणार? जमेल तसं पायांना वाकवत, वळवत मी काही आसनांशी जमवून घेण्याचा द्राविडी प्राणायाम केला. घरी विचारलं तर सांगण्यासाठी काही आसनांची नावं लक्षात ठेवत होते, एवढ्यात शवासनात झोपण्यासाठी आदेश मिळाला,  मी इतरांबरोबर आडवी झाले.  आणि काय आश्चर्य … मी जागी झाले, तेव्हा अर्धा क्लास घरी निघून गेलेला, तर काही चटयांच्या गुंडाळ्या करत होते. हे एक तरी आसन आपल्याला जमलं असं मनाशी म्हणायचा अवकाश, “ चांगलीच झोप लागली की तुम्हाला,” असे योग मैत्रिणीचे शब्द कानावर पडले, आणि मी खजिल झाले. 
        हर एक प्रयत्न मी सुरु करून लगेच अबाउट टर्न घेत होते. एकीकडे कधी सूप, सलाड चा मारा, तर कधी चणे कुरमुरे वर दिवस काढत होते, पण म्हणावं तसा  वजनाचा काटा काही हलत नव्हता.रोज नुसता प्रोटीन शेक प्यायचा , अन्न खायचं नाही, हा प्रयोग मात्र आवडून गेला. घरात सगळ्यांनी असंच केलं तर स्वयंपाकातून तरी सुटका होईल, या कल्पनेने मनात मांडे खाल्ले. बघा, परत काहीतरी खाल्लंच. खाणं मोजण्यासाठी एक छोटा वजनाचा काटा ओट्यावर विराजमान झाला. पण पहिले पाढे पंचावन्न . सारखं , पहिलं वजन तेवढच . एकंदरीत माझ्या डाएट आणि व्यायामावरच्या विश्वासाला सुरूंग लागला होता. चार दिवस चालणे, तर चार दिवस दमून आराम करणे, असा नित्यक्रम झाला होता.घरातल्यांनी हळूहळू माघार घेतली. माझं ही वजन कमी करण्याचं खूळ जॉगिंग च्या शूज बरोबर कोपऱ्यात पडलं. श्रावण , गणपती, पाठोपाठ आलेलं  नवरात्र देवाला गोडाधोडाची लाच देऊन दणक्यात पार पडलं. एकदा  सहज विमा पॉलिसी काढण्यासाठी रक्त तपासलं , त्यात अनेक विटामिन मला सोडून चालती झालीत, कोलेस्टेरोल ने लाल बावटा फडकवलाय , साखर कारखानदारी जोमात चाललीये , तिची निर्यात सुद्धा सहज शक्य आहे, असे भीषण रीपोर्ट  आले. आमच्या फॅमिली डॉक्टरनी चष्म्यातून माझ्याकडे असं काही बघितलं की त्या क्षणी मी ठरवलं की जे काही प्रयत्न आता वजन कमी करायला करायचे , त्यात सातत्य असलं पाहिजे. आणि त्यासाठी एकच गोष्ट पाहिजे, तो म्हणजे “ मनोनिग्रह “. शोधतेय बापडी त्याला जिकडे तिकडे. तुम्हाला सापडला कुठे तर पाठवाल नं माझ्याकडे  नक्की?

डॉ. स्मिता दातार 
drsmitadatar@gmail.com

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !