“नेत्राsss आज उठायचं की नाही तुला?” आईनं स्वयंपाकघरातून नेत्राला हाक मारली.
आईच्या हाकेनं ती जागी झाली. मांडी घालून कॉटवर बसली. तिनं खिडकीबाहेर नजर टाकली तर दूरवर पसरलेली बिल्डींग्सची रांग आणि त्यामधून वाहत असलेला निर्जन रस्ता तिला दिसला. दुपारचे चार वाजून गेले होते. उन्हं उतरतं होती; पण नेत्राचा आळस मात्र उतरत नव्हता. रविवारचा पूर्ण दिवस झोपून काढायचा बेत तिनं कालच ठरविला होता.
“आज रविवार, म्हणजे कवी डॉक्टर येणार” ती पुटपुटली. “या दोन वर्षात डॉ. कविश पानसरेचा कवी डॉक्टर कधी आणि कसा झाला?” हा विचार मनात येऊन ती स्वतःशीच हसली. “डॉक्टर आजकाल आपल्या घरी खूपच वाऱ्या करायला लागले आहेत. आपलं आणि त्यांचं पटत बुवा. त्यांच्याबरोबर कॉलेजच्या गप्पा मारताना छान वाटतं. डॉक्टर आपुलकीनं आणि नेमानं भेटायला येतात. आईची काळजी करतात. एवढ्या वर्षात आपल्या घरी कोणीही फिरकलं नाही. आईनं नेहमीच सगळ्यांना दूर ठेवलं” ती म्हणते, ”लोक फार मतलबी असतात. आपण नेहमी सावध असावं. भावनांचं भांडवल करणारे तुला नेहमीच भेटत राहतील. तू त्यांना ओळखायला शिक, कारण भावनांना जपणं आजकाल लोकांना परवडत नाही. दोन वर्षांपूर्वी ‘ग्रंथालीनं’ एक ‘वाचक मेळावा’ भरवला होता. त्या मेळाव्यात डॉ. कविशची आईशी ओळख झाली. आपली नोकरी सांभाळून आई अधून-मधून लिहिते, तसंच आपला दवाखाना सांभाळून डॉ. कविश लेखनाची आवड जपतात. त्या दिवशी मेळावा संपल्यानंतर डॉक्टर प्रथमच आमच्या घरी आले होते. कदाचित आईनं डॅाक्टरांना पहिल्याच भेटीत स्वतःविषयी आणि स्वतःच्या दुर्दैवाविषयी बरंच काही सांगितलं असावं; त्यांच्या बोलण्यातून मला ते जाणवलं होतं. मी पाच वर्षांची होते तेव्हा बाबा गेले…मला ते नीटसे आठवतदेखील नाहीत. बाबा गेल्यानंतर आईनं माझ्यासाठी दुसरं लग्न केलं नाही. बाबांवर तिचं खूप प्रेम होतं. त्यांच्यानंतर त्यांच्याच जागेवर बँकेत ती कामाला लागली. कोणावरही अवलंबून राहणं तिला पटणारं नव्हतं म्हणून ती कंबर कसून उभी राहिली. आजतागायत तिला कुणाचीही गरज पडली नाही. तळहातावरच्या फोडाप्रमाणं तिनं मला जपलं, माझ्यासमोर साऱ्या सुखांची खैरात मांडली. ‘मला वडील नाहीत’ याचं दुःख तिनं मला जाणवू दिलं नाही. तिच्या कर्तव्यात ती कुठंही कमी पडली नाही”
डॉक्टर कवी आता नेत्राच्या खूपच परिचयाचे झाले होते. ती कवींना पूज्य मानत होती. दर रविवारी स्वतःच्या कुटुंबाबरोबर दिवस मजेत घालवणारे डॉक्टर आता दर रविवारी ‘श्रीमती सुचित्रा बागवे’ यांच्या घरी संध्याकाळ घालवत होते. सर्वांशी चार हातांचं अंतर ठेवून वागणारी तिची आई डॉ.कवींना अटकाव करत नव्हती. नेत्राला या कोड्याचं उत्तर सापडत नव्हतं. पण तिला वाटलं की, आपली आई आयुष्यात प्रथमच भावनेच्या आहारी गेली आहे.
“नेत्राsssss अगं ए नेत्राsss कुठं समाधी लावून बसलीयस?”
आईच्या या दुसऱ्या हाकेसरशी नेत्राची समाधी खरोखरंच भंग पावली. तिनं मान वळवून घड्याळाकडे नजर टाकली. पाच वाजून तीस मिनिटे झाली होती. थंडीचे दिवस असल्यामुळं अंधार लवकरच दाटत चालला होता. आईनं थोड्याच दिवसांपूर्वी आणलेला पंजाबी ड्रेस तिनं अल्टर करून आज घातला होता. तो ड्रेस तिला व्यवस्थित बसला होता; फक्त त्याचा गळा थोडा फाकला होता. नेत्रा जागेवरून उठली आणि बेसिनजवळ जाऊन तिनं तोंडावर पाणी मारलं. तेवढ्यात,
“कर्र …कर्र”
दारावरची बेल वाजली. बेलचा आवाज ऐकताच नेत्रानं झटकन तोंड पुसलं आणि ती दरवाज्याकडे वळली. जाता-जाता खिडकीच्या कठड्यावरचा केसांचा रबर तिनं उचलला, खांद्यापर्यंत रूळणारे केस तिनं त्यात व्यवस्थित बसविले. दरवाज्याच्या कडीला हात घालता-घालता तिनं स्वतःच्या उघड्या मानेवरून हात फिरवून आपले केस व्यवस्थित बांधले गेल्याची खात्री केली आणि शेवटच्या क्षणी ड्रेस झटकून खाडकन दरवाजा उघडला.
दारात डॉ. कविश उभे होते. हसत-हसत आत येताना त्यांनी विचारलं, “हे काय नेत्रा, नुकतीच झोपेतून उठलेली दिसतेयंस.”
बोलता-बोलता डॉक्टरांची नजर तिच्या चेहऱ्यावरून घसरत, तिच्या उघड्या गळ्याभोवती उगीचच घुटमळली. कवींचं बघणं तिला तितकसं आवडलं नाही. तिनं पटकन नजर वळविली. तेवढ्यात आईचा स्वयंपाकघरातून आवाज आला,“डॉक्टर तुम्ही चहा घेणार ना?”
“होय जरूर घेईन; आता फुल टाईम केवळ लेखन करायचं ठरवतोय मी” डॉक्टर हसत कोचावर बसत म्हणाले.
नेत्रा आतमध्ये गेली. कपाट उघडून तिनं काळ्या रंगाची एक ओढणी काढली. स्वतःच्या गळ्याभोवती ती ओढणी लपेटून ती सरळ किचनमध्ये गेली. आईनं चहाचे तीन कप तयारच ठेवले होते. नेत्रानं सवयीनुसार दोन कप उचलले. फक्त दोनचं मिनिटे ती थांबली; कदाचित डॉक्टरांचा तेव्हाचा चेहरा आठवून असेल, ती तशीच बाहेर आली…हातात एकही कप न घेता. डॉक्टरांसमोर खुर्चीत बसत असताना तिनं केस मोकळे सोडले. जणू काही ती आपला गळा थोडासुद्धा उघडा पाडू इच्छित नव्हती. पण डॉ.कवींच्या अनुभवी नजरेतून तिची ती घाई निसटली नाही. आई चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिनं डॉक्टरांना आणि नेत्राला चहा दिला. स्वतः एक कप घेऊन तीही डॉक्टरांशेजारी बसली. डॉक्टऱ आणि आई बोलत होते. पण नेत्राला एकही शब्द ऐकू येत नव्हता. तिचं चित्त आज थाऱ्यावर नव्हतं. डॉ. कवी तिला खूप आवडत होते; पण मग त्यांचा आपल्याला राग का यावा? याचं कारण तिला उमजत नव्हतं. कारण शोधण्याचा जराही प्रयत्न न करता ती पुन्हा दुसऱ्याच विचारात मग्न झाली.
काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये वेशभूषेच्या स्पर्धेची ती इतर मित्र-मैत्रिणींबरोबर चर्चा करत होती. तेव्हा तिथे तो आला होता आणि त्यानं स्वतःच सगळ्यांशी ओळख करून घेतली होती. “मी अजित पांचाल फर्स्ट इयर बी.एस्सी स्टुडेंट.” फर्स्ट इयरच्या मानानं नेत्राला तो थोडा मोठाच वाटला होता. तिनं तसं बोलून दाखवल्यावर तो म्हणाला होता; की त्याला उशीरा शाळेत दाखल करण्यात आलं होतं. आजकाल त्याची नेत्राशी मैत्री वाढत होती. कॉलेजमध्ये जाता-येता तो तिला भेटत होता. त्यालाही अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आवडत होतं. कॉलेजच्या सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये त्याला इंटरेस्ट होताच त्यामुळे त्याची आणि नेत्राची भेट घडतच असे.
नेत्राचं स्वतःच असं विश्व फारच छोटं होतं. आधी त्यात ती आणि आई दोघीच होत्या. तिच्या आईच्या कृपेनं ती आज एक हुशार, गुणी, सुंदर मुलगी होती. परंतु आपलं कर्तव्य पार पाडत असताना तिच्या आईच्या हातून एकच गोष्ट निसटली…ती म्हणजे ‘स्पर्श’. नेत्राच्या आईला आपलं प्रेम स्पर्शाद्वारे व्यक्त करण्यास कधीच वेळ मिळाला नाही आणि नेत्रा प्रेमाच्या या स्पर्शाला मुकली. कुढत-कुढत बालपण घालवत असताना नकळत एकाकी बनली. आईनं तिला शिस्तीत वाढवलं, खूपच जपलं. त्यामुळे नकळत ती लुळी झाली. स्वतंत्र विचार करण्यास असमर्थ ठरली. अशा परिस्थितीत डॉ. कवींनी तिच्या विश्वात पदार्पण केलं. त्यांच्या सहवासात ती मोकळा श्वास घेऊ लागली होती, तिचा एकाकीपणा दूर होऊ लागला होता. तिच्या विचारांना चालना देणारेही कवीच होते. या दोन वर्षात कवी आणि नेत्रा यांच्यात एवढी जवळीक निर्माण झाली की, पपांचा फोटो बघताना कधीकधी तिला त्यात कवींच रुंद हास्य दिसे. लहानपणापासून ‘बाबा’ हे पात्र तिनं अभ्यासाच्या पुस्तकात वाचलं होतं. आईच्या तोंडून ऐकलं होतं, मैत्रीणींनी ऐकवलं होतं. एवढ असूनही तिनं ते अनुभवलं नव्हतं. ‘आपली आई कामात गर्क आहे, माझे पपा माझ्याजवळ आहेत. मला ते गोष्टी सांगत आहेत, गोंजारत आहेत.’ अशी स्वप्नं तिला वारंवार पडतात. ‘पपा’ ही व्यक्ती कशी असेल तिला माहित नव्हतं आणि म्हणूनच ती कवींचा पपा करायला बघत होती. हल्ली ‘अजित पांचाल’ तिच्या या छोटेखानी विश्वात शिरू पाहात होता. पण तो तिला गैर वाटत होता कारण तो डॉ.कवींइतका तिला जवळचा वाटत नव्हता. स्वतःच्या भावविश्वात रमणारी, जगरहाटी न उमजलेली, जास्त मित्र-मैत्रिणी नसलेली नेत्रा आपले सारे निर्णय ‘मनाने’ घेत होती ‘विचाराने’ नाही. ओढणीशी चाळा करत बसलेली नेत्रा विचारात गुंग झाली आहे हे पाहून, कवींनी मोठ्या आवाजात विचारलं,“नेत्रा, आज तुझं मौन व्रत तर नाही ना?”
“नाही तर” नेत्रानं विचारांची साखळी तोडली.
बऱ्याच वेळापूर्वी सगळ्यांचा चहा संपला होता. आई स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी जायला निघाली. जाता-जाता ती म्हणाली,“नेत्रा, डॉक्टरांना जरा चौथ्या मजल्यावरच्या झेलेकाकांचं घर दाखव. त्यांना तिथे काहीतरी काम आहे”
“हूं. जाते. आत्ताच जायचं आहे का?” नेत्रानं विचारलं.
कवी डॉक्टरांनी घड्याळात बघितलं, “बापरे; पावणे आठ झाले आहेत. वेळ कसा जातो कळतच नाही. चल नेत्रा, तेवढं काम आटपून घेतो”
मग किचनच्या दिशेनं तोंड वळवून ते म्हणाले, ”बराय मी निघतो. थॅंक्स फॅार अ नाइस टी” नेत्रा जागेवरून उठली. बिल्डींगमध्येच जायचं होतं म्हणून जास्त तयारी न करता, पायात स्लीपर चढवून ती दरवाज्याकडे वळली. डॉक्टर व ती दरवाजा उघडून बाहेर आले. लॅच की असलेला दरवाजा ताबडतोब बंद झाला. त्यांच्या बिल्डींगची लिफ्ट गेले आठ दिवस बंदच होती, त्यामुळे जिने चढून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. पहिल्या मजल्यावरून ती आणि डॉक्टर वर चढले. चढता-चढता डॉक्टरांनी प्रश्न केला, “कॉलेज कसं चाललयं तुझं?”
नेत्रानं उत्तर दिलं, ”मजेत चाललयं की!”
तेवढ्यात दुसऱ्या मजल्यावर आल्यावर कळलं; की बिल्डींगची वीज गेलीय. क्षणात चमचमत्या बिल्डींगमध्ये अंधार पसरला. नेत्रा तिथंच थबकली. एवढ्या दाट अंधारात जिन्याचा आधार घेतल्याशिवाय चढता येणार नाही हे तिला कळलं. तिनं जिन्याच्या कठड्यावर हात ठेवला. त्या अंधारातही तिला दिसलं; की डॉक्टर खूपच जवळ उभे आहेत. डॉक्टरांनी हात तिच्यापुढं केला. ते म्हणाले, ”माझा हात पकडून तुला नीट चालता येईल”
नेत्रा बिचकली. हात दयावा की न दयावा हा निर्णय तिला घेता येईना. डॉक्टरांवर विश्वास असतानाही ती म्हणाली, ”नको डॉक्टर. कठड्याला धरून मी एकटी चालू शकेन” एक पायरी उतरून डॉक्टर अधिकच जवळ आले, ”त्यात गैर काय आहे नेत्रा. तुझा पाय घसरेल. हात दे लवकर”
तरीही नेत्रा उत्तरली, ”नको डॉक्टर; मी काळजी घेईन”
कवींनी हात पुढे केला आणि म्हंटलं, ”हात दे लवकर. मी आहे ना काळजी घ्यायला” नेत्राने हातात हात दिला. कवींनी तिचा हात घट्ट पकडला. आपल्या हाताची पाचही बोटं तिच्या पाचही बोटांमध्ये गुंतवून त्यांनी तो हात वर उचलला. आपल्या शर्टच्या खिशाला तिच्या हातांचा स्पर्श होईलसे करून ते म्हणाले, “नेत्रा आय लाइक यू. तू मला फार आवडतेस. यू आर अ गुड गर्ल. या दोन वर्षात मी तुला ओळखलं. मीही आतापर्यंत तुझ्यासारखंच एकाकी जीवन जगलोय. तुला माहित आहे? मी तुझ्या घरी का येतो? तुझं रितेपण संपवायला मी तयार आहे, जर तुझी संमती असेल तर…”
पुढचे शब्द नेत्राला ऐकूच आले नाहीत; कारण ती सुन्न झाली होती. आपण उभं असलेली बिल्डींग कोसळणार की काय असं तिला वाटलं. स्वतःचा हात सोडवून घेण्याची तिची धडपड व्यर्थ होती. चौथ्या मजल्यापर्यंत ती कशीबशी चढली. थोडावेळ शांतता होती. पण कवींचा ‘स्पर्श’ बोलत होता. ‘एका विधवा स्त्रीच्या मुलीला दाखविलेल्या जिव्हाळ्याची परतफेड तो स्पर्श मागत होता’ झेलेकाकांच्या दरवाज्यापर्यंत पोहचण्याआधीच वीज आली. उजेड दिसू लागला. सारं काही स्वच्छ दिसू लागलं. त्या प्रकाशात कवी डॉक्टरांचा चेहरा नेत्राला स्वच्छपणे दिसू लागला. डॉक्टरांनी हात सोडला आणि तिच्यावर नजर रोखली. ती परत येण्यासाठी झटकन वळली. पायऱ्या उतरता उतरता तिला झेलेकाकांच्या बेलचा आवाज ऐकू आला. नेत्रा घरी आली. काहीही न बोलता ती बेडरूममध्ये गेली. आई तिच्या मागोमाग येऊन रुमच्या दारात उभी राहिली. डॉक्टर येऊन गेल्याचा आनंद अजूनही तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. नेत्राला तिच्या चेहऱ्याकडं बघण्याचाही धीर होत नव्हता. आपला चेहरा आईने वाचू नये म्हणून, चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली,“आई, डॉक्टरांना सोडलं मी काकांच्या दारापर्यंत”
आईनं विचारलं, ”अंधारात कुठे ठेचाळली नाहीस ना ?”
ती मोठ्याने म्हणाली, ”नाहीsssss गं”
आई पुन्हा कामाला लागली. नेत्राचं सर्वांग थरथरत होतं. तिला खूप रडावसं वाटत होतं; पण आई कुठल्याही क्षणी आत येईल म्हणून ती एक पुस्तक डोळ्यासमोर उघडून बसली. त्या पुस्तकातही तिला डॉ.कवींची प्रतिमा दिसली. पण या प्रतिमेतला डॉक्टरांचा चेहरा डागाळलेला होता; अगदी जिन्यावरच्या अंधारात दिसला तसा.“डॉक्टरांनी असं का करावं? डॉक्टरांना नक्की काय सूचित करायचं होतं? त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ भयंकर होता” नेत्रानं डोळे मिटले आणि कवी डॉक्टर तिच्यासमोर उभे राहिले. कवी चाळीस वर्षांचे आहेत. माझ्यापेक्षा बावीस वर्षांनी ते मोठे आहेत. त्यांचं लग्न झालेलं आहे. बायको आणि दहा वर्षांचा मुलगा असा त्यांचा संसार आहे. ते सोयीस्करपणे सारं काही विसरले. हळूहळू तिच्या लक्षात आलं; की या दीड-दोन वर्षात डॉक्टरांची पत्नी आणि मुलगा आपल्याला कधीच दिसले नाहीत. त्यांचा उल्लेखही कवी टाळत असतं. ते तासनतास फक्त नेत्राशी गप्पा मारत. गप्पा कधी साहित्याबद्दल, कधी नवोदित लेखकांबद्दल, कधी तिच्या आईबद्दल तर कधी-कधी तिच्या भविष्याबद्दल असत. ते नेहमी नेत्राची प्रशंसा करीत. पण दुसऱ्याच क्षणी तिला वाटलं; की डॉक्टर तोंडानंच स्तुती करत होते, त्यांच्या नजरेनं कधीच तिला प्रशंसा बहाल केली नव्हती. “आपल्याबाबतीत आईनं बेफिकिरी दाखविली होती की ती जाणूनबुजून गाफील राहिली? छे भलतंच काय? मी आईबद्दल असा विचारच कसा करू शकले?” नेत्रानं हात जोडून मनोमन आईची क्षमा मागितली. ‘आईच्या तेव्हाच्या ओसंडत असलेल्या आनंदावर, तिच्या डॉक्टरांवर असलेल्या विश्वासावर गदा आणण्याचं धाडस मी करू शकत नाही. मी माझी व्यथा कोणालाही सांगू शकत नाही. मी काहीही करू शकत नाही” ती विचार करून थकली.
आईनं हाक मारताच ती उठली. आईनं जेवण तयारच ठेवलं होतं. त्या दोघी जेवल्या. आई खूप थकली होती. त्यामुळं ती लगेच झोपायला गेली. थोड्यावेळानं नेत्राही तिच्या बाजूला जाऊन पडली. आई गाढ झोपेत होती. पण नेत्राचा डोळा लागत नव्हता. रात्रीच्या अंधारात तिनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उशीत तोंड खुपसून ती खूप रडली. त्याहीस्थितीत तिला कवींचा स्पर्श बोचत होता. अस्वस्थ होऊन ती कॉटवरून खाली उतरली आणि हॉलमध्ये जाऊन थंडगार जमिनीवर पहुडली. एकच क्षण तिला असं वाटलं; की आपण आईला उठवावं आणि सगळं सांगून टाकावं. पण तिला ते जमणारं नव्हतं आणि तिच्या आईच्या पचनी पडणारं नव्हतं. तिनं झोपण्याचा प्रयत्न केला पण कवींचं हसणं, बोलणं तिच्याभोवती थैमान मांडीत होतं.
पानांच्या आड लपून राहिलेलं, हिरव्यागार झाडावरचं नाजूक फूल रस्त्यावरच्या वाटसरूनं तोडून आपल्या झोळीत टाकावं आणि त्या फुलात वेदना उमटावी तशीच वेदना आज नेत्राच्या अंतरंगात उमटली होती.
अखेर रडून-रडून तिचे डोळे सुजले. पहाट होता-होता कधीतरी तिचा डोळा लागला. नेत्रा मनोमन दुखावली गेली होती. आता, पपांचा फोटो बघताना तिला ओक्साबोक्सी रडू येत होतं; कवींचं रुंद हास्य कुठेतरी लुप्त झालं होतं. यावर्षी कवींच्या वाढदिवसाला ती त्यांना ‘पपांचा’ फोटो प्रेझेंट करणार होती. हे तिचं गुपित होतं. पण हे गुपित फुटून बाहेर पडण्याआधीच सडून गेलं. तिचा दिनक्रम नेहमीसारखाच होता. फक्त ती थोडा जास्त वेळ कॉलेजमध्ये घालवत होती. ती लवकर घरातून निघत असे आणि उशीरा घरी परतत असे. अजित पांचाल तिला रोजच भेटत असे. तो नेत्रामध्ये होणारा बदल पहात होता; पण बोलण्याचं टाळत होता.
असेच पंधरा-सोळा दिवस उलटून गेले. पुन्हा एका रविवारी डॉक्टऱ नेत्राच्या घरी येऊन उभे ठाकले. नेत्रा त्यांची नजर चुकवून आतल्या खोलीत जायला वळली. कवींनी खिशातून एक कागद बाहेर काढला आणि म्हणाले, ”ही एक कविता आहे तुझ्यासाठी” नेत्राच्या हातात कागद सरकवताना, तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत कवींनी पुन्हा एकदा तिच्या हातांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्याक्षणी तिला त्यांची कीव करावीशी वाटली. ”या कागदाच्या मागच्या पानावर मला तुझं उत्तर हवं आहे” डाॅक्टर म्हणाले. नेत्रा उठून आतल्या रुममध्ये गेली. डॉक्टर जाईपर्यंत ती बाहेर आलीच नाही.
तो कागद तिने आपल्या पुस्तकात ठेवून दिला. नकळत तिचे डोळे भरून आले. तिला आपले दोन्ही हात कवींच्या स्पर्शानं अपवित्र झाल्यासारखे वाटले. त्या रात्री तिनं आपले दोन्ही हात गरम टेबल-लॅम्पवर ठेवले; तेव्हा तिच्या वेदनेला चांगलीच धार चढली. दुसरा दिवस उजाडला. आईचं नेत्राच्या हातांकडे लक्ष गेलं. तिनं घाबरून नेत्राला विचारलं; तेव्हा नेत्रानं उत्तर दिलं,
”आई, अगं मी रात्री वाचता-वाचता टेबलावरच झोपले. टेबल-लॅम्प पडला. चटके बसले आणि घाईघाईत मी दोन्ही हातांनी पेटता लॅम्प उचलला” आई थोडीशी चिडली. तिच्या हातांना औषध लावता-लावता तिनं नेत्राला विचारलं,”काही दिवस पाहतेय मी तुला. काहीतरी बिनसलंय तुझं. काय ते सांगशील मला?” नेत्रा ह्या प्रश्नाने खरंतर अस्वस्थ झाली पण चेहऱ्यावर ते दिसू न देता ती उत्तरली,”काही नाही गं आई; परीक्षा जवळ आलीय ना”
“हं” म्हणत आई निघून गेली. कॉलेजमध्ये गेल्यावर नेत्रानं तो कागद उघडला आणि ती वाचू लागली, रसाळ, मादक शब्दात तिचं कोवळं तारुण्य चितारलेली कविता; ती पूर्ण वाचूच शकली नाही. “बस्स…पुरे झालं डॉक्टर” नेत्रा जवळजवळ किंचाळलीच. थोड्यावेळापूर्वीच अजित तिथं येऊन उभा राहिला होता. अजितच लक्ष नेत्राच्या हातांकडे गेलं. त्यानं तिचे हात उचलले आणि विचारलं,
”नेत्रा, हे धाडस कधी केलंस? कुणासाठी केलंस? मला नाही का सांगणार?”
नेत्रानं त्याचे हात झिडकारले. “नको हात लावू मला. मला सगळ्यांची चीड येतेय. घृणा वाटतेय साऱ्यांची” नेत्रा चिडून म्हणाली.
“शांत हो नेत्रा” अजित तिच्याशेजारी बसत म्हणाला.
नेत्राला आता असह्य झालं होतं. आतल्या आत वेदना गोठत गेल्याचा तिला खूपच त्रास होत होता. तिनं आपल्या जीवाची चाललेली घालमेल अजितपुढं कथन केली. सुरवातीपासून शेवटपर्यंत तिनं त्याला सारं काही सांगितलं; तिला हवं असलेलं आणि नको असलेलं.
“डॉक्टरांनी माझं छोटसं विश्व संपवलं. माझ्या भावविश्वातून, माझ्या स्वप्नरंजनातून त्यांनी मला बाहेर खेचलं. माझ्या आईच्या विश्वासाला सुरुंग लावला. जे घडू नये ते घडलं. यात चूक कुणाची होती?” नेत्रानं अजितला प्रश्न केला.
अजितनं नेत्राची बाजू ऐकून घेतली. त्याला नेमकं उत्तर दयायचं होतं. तो थोडा वेळ थांबला; मग म्हणाला, “जे झालं यात चूक कुणाचीही नव्हती. प्रत्येकजण आपली खेळी खेळत होतं आणि आपल्या बाजूनं त्यांना जिंकायचं होतं. तुझ्याबद्दल म्हणशील तर; तुझ्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची आणि या जगाची अशीही एक ओळख करून घेण्याची वेळ आली असं समज”
“अजित, जगाची ओळख अशी भयंकर होईल असं वाटलं नव्हतं कधी मला”
“आणि म्हणूनच तू स्वतःला अशी शिक्षा करून घेतलीस” असं म्हणत अजितनं तिचे दोन्ही हात हातात घेतले. अगदी त्याक्षणी नेत्राचे डोळे भरून आले. अजितचा स्पर्श तिला हवाहवासा वाटला.
तिनं पुस्तकातून कागद काढला आणि अजितसमोर धरला. अजितनं तिचा हात थोपटला आणि म्हटलं, ”आय होप तू त्यांना उत्तर देऊ शकशील आता. हातांची नीट काळजी घे” असं म्हणत-म्हणत अजित तिथून निघून गेला.
नेत्राला आज खूप बरं वाटत होतं. अजितशी तिची खास मैत्री नव्हती; पण आज अचानक ती त्याच्यासमोर सारं काही बोलून गेली. या गोष्टीची तिला जराही खंत नव्हती. तिनं अजितवर विश्वास ठेवला होता. याचं कारण विश्वास ठेवल्यानंतर बदलणारा स्पर्श तिनं अनुभवला होता, म्हणूनच स्पर्श अनुभवल्यानंतर अजितवर विश्वास ठेवणं तिला सोपं झालं होतं. त्याच आनंदात ती घरी गेली. आज आईबरोबर तिनं इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आठवणीनं हातांना औषध लावलं. रात्री बिछान्यावर पडल्या-पडल्या तिचं विचारचक्र सुरु झालं.
“मी काय अनुभवलं? फक्त दोन स्पर्श; एक स्वार्थी आणि मागणी करणारा तर दुसरा निःस्वार्थी आणि काहीतरी देऊ करणारा. मी दोन प्रवृत्तींना जाणलं. एक किळसवाणी तर दुसरी लोभसवाणी. एक स्पर्श आधाराची याचना करत होता तर दुसरा आधारासाठी धावून येत होता. डॉ. कवींचा हस्तस्पर्श दुष्कर्म करण्यासाठी होता, म्हणून त्याला अंधाराची गरज पडली. अजितचा स्पर्श दिलासा देणारा होता, त्या स्पर्शात आपुलकीचा अंश होता; तर डॉ. कवींचा स्पर्श दंश होता. आज मी दोन व्यक्तींना ओळखलं, एक म्हणजे डॉ. कवी आणि दुसरा अजित” नेत्रा उठली. पुस्तक उघडून तिनं तो कागद काढला आणि त्यावर लिहिण्यास सुरुवात केली,
डॉक्टर कविश पानसरे,
“तुम्ही उत्तम दर्जाचे कलाकार आहात. तुमचं नाटक तुम्ही छान वठवलं. एकच गोष्ट चांगली घडली तुमच्या हातून; की या नाटकाचा शेवट तुम्ही माझ्यावर सोपविलात. मला काही काळापुरते तरी तुमच्याकडून लाभलेल्या जिव्हाळ्याची, प्रेमाची कत्तल न करण्याची जर तुमची इच्छा असेल तर पुन्हा मला तोंड दाखवू नका”
एवढं लिहून नेत्रानं कागद लिफाफ्यात बंद करून टाकला.
समाप्त
लेखिका
शिल्पा गायंगी गंजी