पर्यावरणाचा तोल सांभाळणारे नाग-साप मानवासाठी उपकारक आहेत, हाच नागपंचमीचा संदेश आहे.
श्रावण महिन्यात रिमझिमत्या सरी पडत असतात आणि त्याच काळात भरपूर सण साजरे केले जातात.खास श्रावणमासात जे सण येतात, त्यातला नागपंचमी हा महत्त्वाचा सण. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो. अजूनही खेडोपाडीच्या सख्या ‘चल ग सये वारुळाला। नागोबाला पूजायाला! हळदीकुंकू वाहायला। ताज्या लाह्या वेचायाला।। हे नागपंचमीचे खास गीत गात वारुळाकडे नागदेवतेची पूजा करायला जाताना दिसतात. हा सण ग्रामीण भागात तसेच शहरातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नागपंचमी हा सण नाग-सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो. साप-नाग, अजगर हे विषारी सरपटणारे प्राणी माणसांसाठी धोकादायक असले तरी शेतकऱ्यांचे मात्रते एकप्रकारे उपकारकर्तेच आहेत. कारण भारतातल्या शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या धान्याची नासाडी शेतातले उंदीर करतात. साप, नागांमुळे उंदरांचा आपोआपच बंदोबस्त होतो. म्हणूनच नाग-सापाची हत्या न करता त्यांना जंगलात, शेतात सोडून द्यावे असे सांगण्यात येते आणि ते योग्यच आहे. आपल्या संस्कृतीत नागांना देवतास्वरूप मानण्यात आले आहे.
नागांबद्दलच्या अनेक पौराणिक कथाही प्रसिद्ध आहेत. नागपंचमीला हिंदू सणांमध्ये एवढे महत्त्व आहे की, काहींच्या मते अक्षय्यतृतीयेच्या ऐवजी नागपंचमी हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. असे म्हणतात की, वासुकी, तक्षक, कालिया, मणिभद्र, ऐरावत यांना दुधाने स्नान घातल्यास ते विषबाधेपासून अभय देतात. नाग-साप चावल्यास विषबाधा न होण्यासाठी नागाची पूजा करावी. पण ही फक्त दंतकथा आहे. नागपंचमी साजरी करण्यामागचे हे शास्त्रीय कारण नाही. पण नागपंचमी साजरी करण्यामागे एका शेतकऱ्याची दंतकथाही सांगितली जाते. एका शेतकऱ्याने सकाळच्या वेळी जमीन नांगरायला सुरुवात केली. तो नांगर नेमका जमिनीखालच्या वारुळात घुसला आणि त्यामुळे वारुळातली नागाची पिल्ले मरण पावली. ते पाहून नागिणीला खूप राग आला. तिने शेतकरी व त्याच्या कुटुंबाला दंश करून ठार मारले.
तिला असे कळले की, शेतकऱ्याची एक मुलगी परगावी राहते. तिला ठार मारण्यासाठी ती नागीण तिच्या गावी गेली. तिच्या घरात जाऊन पाहते तो तिला वेगळेच चित्र दिसले. शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर चंदनाने नाग काढला होता. त्याची पूजा करून तिने नागाला दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवला. हे सर्व ती नागीण पाहात होती. शेतकऱ्याच्या मुलीने दाखवलेला भक्तिभाव पाहून ती प्रसन्न झाली आणि नैवेद्याला ठेवलेलं दूध तिने पिऊन टाकले. तिने त्या मुलीला डोळे उघडायला सांगितले. समोर नागिणीला पाहून ती मुलगी घाबरली. पण नागिणीने तिला अभय दिले व घडलेली घटना सांगितली. शेतकऱ्याच्या मुलीने नागिणीची क्षमा मागून आपल्या माता-पित्यांना व भावांना जिवंत करण्याची विनंती केली. नागिणीने तत्काळ शेतकऱ्याला व त्याच्या कुटुंबीयांना जिवंत केले. ही कहाणी नागपंचमीच्या निमित्ताने वर्षांनुवर्ष एक पिढी दुसन्या पिढीला सांगते. म्हणूनच या दिवशी स्त्रिया Cशवासी ब्रत करतात. नागपंचमीच्या दिवशी त्या एकभुक्त राहतात.
सकाळी अभ्यंगस्नान करतात. घराच्या दारांवर, भिंतीवर, पाटावर चंदनाने पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढतात. नागांसोबत नागिणींचेही चित्र काढतात. ग्रामीण भागात घरांच्या भिंती गाईच्या शेणाने सारवून त्यावर नागाची आकृती काढतात. पूजा करतात. संध्याकाळी नागाला दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवून खिरीचे जेवण करुन उपवास सोडतात. या दिवशी पुरोहिताला गाय व सुवर्णाची नागप्रतिमा दान देण्याची प्रथा आहे.
ग्रामीण भागात या सणाला वेगळेच महत्त्व आहे. तिथे नागपंचमीला हातावर मेंदी काढली जाते. शेतात, अंगणात झोपाळे बांधले जातात. नागाची पूजा वारुळाला जाऊन केली जाते. त्यानंतर झिम्मा, फुगड्या खेळल्या जातात, झोपाळ्यावर उंच झोके घेत लोकगीते म्हटली जातात. फेर धरून सासर-माहेरची गाणी म्हटली जातात. ही गाणी गद्यात असतात. या गाण्यांमध्ये बाळाई, भारजा, जैता, बहुला, गाय इत्यादींच्या कथाही गुंफलेल्या आहेत.
बरेचदा नवीन लग्न झालेल्या सासुरवाशिणी नागपंचमीला माहेरी येतात. तिथे नागाला भाऊ मानण्याची पद्धत आहे. वर्षातून एकदा नागाची पूजा केली, उपवास केला तर नाग आपल्याला इजा करणार नाहीच; शिवाय आपल्या मदतीला धावून येईल अशी कल्पना रूढ आहे. काही ठिकाणी नागाची पूजा करण्यासाठी मातीचे नाग बनवले जातात. काही ठिकाणी लाकडी पाटावर गंधाने सापांची चित्रे काढतात किंवा पिवळा रंग दिलेली मातीची चित्रे विकत घेऊन त्यांची पूजा करतात. त्यांना दूध अर्पण करतात.
बऱ्याच ठिकाणी गारुडी साप-नाग घेऊन घरोघरी फिरतात. लोक त्यांना पैसे देतात व सापांना दूध पाजतात. वास्तविक साप-नाग हे मांसभक्षक प्राणी आहेत. ते दूध पीत नाहीत. त्यांना जबरदस्तीने दूध पाजल्यास त्यांना अपचन होऊन ते मरण्याची भीती असते.
नागपंचमीच्या दिवशी आहाराबाबतीतही काही पथ्ये पाळली जातात. या दिवशी शेतकऱ्याच्या कथेचे स्मरण करून घरात विळीवर अथवा सुरीने काहीही चिरले जात नाही. शेतात नांगर फिरवला जात नाही. काही कापले जात नाही. तळत नाहीत अथवा भाजत नाहीत. या दिवशी पुरण व कणकेपासून बनलेले दिंड- मोदकासारखे उकडलेले पदार्थ खातात. नागपंचमीचा सण हा ऐन पावसाळ्यात येतो. या काळात तेलकट, तूपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यास त्यापासून अपाय होण्याची शक्यता असते. म्हणून कदाचित उकडलेले पदार्थ खाण्याची प्रथा पडली असावी. नागाची पूजा करणे, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे नागपंचमी साजरी करण्यामागचे मूळ कारण आहे. नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतात धुमाकूळ घालणाऱ्या उंदरांचा नाग-साप बंदोबस्त करतात, शेतात उंदरांसारखे उपद्रवी जीव न होण्यामागे तसेच माती सुपीक राहण्यासाठी तिथला सापांचा वावर उपयुक्त आहे.
वर्षातून एकदा शेतकरी कृतज्ञतेने ‘नागपंचमी’ साजरी करतात. नागपंचमीच्या दिवशी बत्तीस शिराळा आणि भीमाशंकर या ठिकाणी मोठी जत्रा असते. या भागातील शेतकरी अथवा गारुडी शेतातील, जंगलातील मोठमोठ्या नागांना पकडतात आणि नागपंचमीच्या दिवशी त्यांचे प्रदर्शन भरवतात. नागपंचमीच्या आधी महिना-दीड महिना नागांना पकडण्यात येते; पण पकडताना त्यांना इजा होते. नागपंचमीनंतर या नागांना पुन्हा सोडून देण्यात येत असले तरी पकडताना, हाताळताना त्यांना इजा होते, त्यामुळे अनेक नाग नंतर मरतात असे सर्पतज्ज्ञाचे निरीक्षण आहे. नाग-सापांचे पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्व लक्षात घेतल्यास नागांना याप्रकारे पकडून त्यांचे प्रदर्शन करणे कितपत योग्य आहे, याचा विचार व्हायला हवा, अशाप्रकारे नागपंचमी साजरी करण्यापेक्षा नाग-सापांना त्यांच्या जंगलात सुरक्षितपणे व सन्मानाने जगायला मिळाले तरी ते अधिक चांगले होईल.
ऋग्वेदात सापांचा उल्लेख आहे. तसेच अथर्ववेदात तक्षक व धृतराष्ट्र प्रभृती या सर्वांची नावे वाचायला मिळतात. वेदकालात सर्प ही गंधर्वांची एक जमात बनली होती. महाभारतातही नागांचा उल्लेख आहे. उत्तर भारतात असे मानले जाते की, सर्पदंशामुळे होणाऱ्या मनुष्यहानीमुळे नागांची पूजा करण्याची प्रथा पडली. तिथे पुरुष दुधाची मोठी भांडी घेऊन गावाबाहेर किंवा जंगलात जातात व नागांच्या वारुळात ती भांडी रिकामी करतात. बंगाल व छोटा नागपूरमध्ये सर्पराज्ञी मनसाची पूजा करण्याची पद्धत आहे.
बिहारमध्ये काही समाजातील स्त्रिया स्वत:ला नागपत्नी समजून सापांची गाणी गातात. कर्नाटकात या दिवशी गूळ-पापडीचे लाडू करतात. त्यांना ‘तंबीट’ असे म्हणतात. गुजरातमध्ये नागमूर्तीपुढे तुपाचा दिवा लावतात व मूर्तीवर जलाभिषेक करतात. काशी शहरात तर या दिवशी मिरवणुका निघतात. संध्याकाळी नागकुंवा जलाशयावर जमलेल्या नागमूर्तीचे पूजन होते. या दिवशी तिथे होणारे पंडितांचे वादविवाद प्रसिद्ध आहेत. भारतभरात साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी सणाचे महत्त्व स्थानपरत्वे वेगळं आहे, तसेच हा सण साजरा करण्याची पद्धतही वेगळी आहे.
-शीतल नलावडे