आषाढी एकादशीचे पौराणिक माहात्म्य मोठेच आहे; परंतु महाराष्ट्रात या दिवसाला सणाचे माहात्म्य लाभले ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर-तुकोबांच्या वारकरी संप्रदायामुळे. आषाढी एकादशीस पंढरपुरात जो भक्तिमेळा जमतो तो बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो.
ज्येष्ठाचे कडक ऊन पाठीवर घेत शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला खरा निवांतपणा मिळतो तो आषाढात. पेरणी होऊन भुईतून डोके वर काढणाऱ्या पिकाला बघताना शेतकऱ्याचे डोळे खऱ्या अर्थाने निवतात. मग त्याची नजर लागते ती पांडुरंगाकडे.
आषाढीच्या एकादशीला विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवायला तो आतुर होतो. एकादशी हे विष्णूचे व्रत मानतात. एकादशी हे उपवास व्रत आहे. आषाढात येणाऱ्या एकादशीपासूनभगवान् विष्णू निद्रावस्थेत जातात आणि हा निद्राकाळ चार महिन्यांचा असतो आणि विष्णू जागृत होतात ते कार्तिकी एकादशीला. म्हणून वर्षभरात येणाऱ्या २४ एकादश्यांपैकी- याशिवाय (अधिक महिन्याच्या दोन एकादशींची भर पडते!) आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशी व्रताची पौराणिक कथा याप्रमाणे आहे. मृदुमान्य असुराने शंकर महादेवाची घोर तपश्चर्या केली. शंकरांनी प्रसन्न झाल्यावर मृदुमान्य असुराला वर दिला की, तुला स्त्रीशिवाय कोणाकडूनही मरण येणार नाही.
आपल्यासारख्या बलाढ्य असुराला कुठली स्त्री-(म्हणजे अबला) मारू शकेल! असा विचार त्याने केला आणि उन्मत्त होऊन मृदुमान्य असुराने देवांवरच हल्ले करण्यास प्रारंभ केला. स्वर्ग-पृथ्वीवर त्याने धुमाकूळ घातला. * पृथ्वी- पालनाची जबाबदारी श्री विष्णूकडे असल्याने ते मृदुमान्याच्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, याच्या सल्लामसलतीसाठी गेले. पण शंकरांनी दिलेल्या वरदानामुळे काय करावे हे कोणालाच सुचेना. त्यातच मृदुमान्य पाठी लागल्याने ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिघेही एका गुहेत जाऊन बसले. बाहेर मृदुमान्य उभा असल्याने त्याला बाहेर पडता येईना. त्यादिवशी या तीन देवांना उपवास घडला आणि तिथेच त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. या देवतेने मृदुमान्य असुराला ठार मारले. देवलोक आणि मानवलोक यांची त्यांच्या जाचापासून सुटका केली. तो दिवस आषाढ एकादशीचा होता म्हणून या दिवशी व्रत करण्याचा नियम पडला.
देव आणि मानव हे दोघेही एकादशीचे व्रत करतात, असे शास्त्र सांगते. एकादशी ही तिथी महिन्यातून शुक्ल आणि कृष्णपक्षात येते. या दोन्ही दिवशी एकादशी व्रत करावे असे म्हटले जाते. नित्य आणि काम्य या दोन पद्धतीने एकादशी व्रत करण्यात येतं. नित्य म्हणजे नेहमी करावयाचे व्रत असे धर्मशास्त्रात सांगण्यात आले असून, काम्यव्रत हे विशिष्ट इच्छा आणि हेतू मनात धरून करण्यात येते. एकादशीचे व्रत वा उपवास म्हणजे अन्नभक्षण न करणे एवढाच नसून, ‘प्रतिज्ञापूर्वक मी अन्नभक्षण करणार नाही आणि परमेश्वराचे नित्यस्मरण करेन’ असा त्याचा अर्थ आहे.गृहस्थाश्रमी व्यक्ती शुद्ध एकादशीस हे व्रत नित्य करते. हे अनिवार्य असून, आषाढी आणि कार्तिकी एकादशीस व्रत करावे असे म्हटलेले आहे. एकादशी हे व्रत प्रायश्चित्त व्रत आहे असे मानले जाते. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीस व्रत करणाऱ्याने एकभुक्त रहावे म्हणजे त्याने दोन प्रहरी एकवार भोजन घ्यावे आणि रात्रीचे भोजन करून दशमीच्या रात्रीपासून एकादशी व्रताचे पालन करण्यास प्रारंभ करावा.
एकादशीच्या दिवशी निजून उठल्यावर मन आणि शरीर स्वच्छ करून श्रद्धापूर्वक उपोषणाचा संकल्प करावा. हातातील पात्रात पाणी घेऊन त्यावर हात ठेवून ‘ॐ नमो नारायणाय’ या अष्टाक्षरी मंत्राचा त्रिवार उच्चार करावा आणि ते पाणी प्राशन करून फुलांनी सजवलेल्या मंडपात विष्णूप्रतिमा ठेवावी. या प्रतिमेचे पूजन करावे. दिवसा स्तोत्रे-भजनादी म्हणून रात्री कीर्तन करून जागरण करावे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हरीचे पूजन करून आपण केलेले व्रत आणि उपवास देवाला अर्पण करावा आणि देवाची प्रार्थना करून उपवास व्रताची सांगता करावी. एकादशी व्रताचा हा सर्वमान्य विधी आहे.परंतु ज्यांना वर्षातील सर्व एकादशांचे व्रत करणे जमत नाही त्यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशी केल्यास सर्व एकादशींचे पुण्य मिळते, असे आषाढी एकादशीचे महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी उपोषण करण्याच्या मुळाशी धार्मिक आणि आध्यात्मिक कल्पना आहे; परंतु त्याचा उद्देश मनाचे नियंत्रण करणे हा आहे.आनंदाने केलेल्या उपोषणाच्या योगाने मनुष्याच्या मनातील पाशवी विकार धुतले जाऊन तो ईश्वरी कृपाप्रसादाला पात्र होतो अशी ग्वाही पुराणे आणि वेदांनी दिलेली आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून गळ्यात तुळशीमाळा घालून टाळ-मृदुंगांच्या चालीवर ग्यानबा-तुकाराम आणि विठ्ठलाचा गजर करत वारकरी पंढरपूरची वाट पकडतात. दरवर्षीची वारी चुकवायची नाही हा वारकऱ्यांचा नेमच असतो. चंद्रभागेच्या तीरावर हरिनामाचा गजर करायचा, पांडुरंगाच्या पावलावर डोके टेकवायचे आणि परतीची वाट पकडायची असा क्रम असतो. पंढरपूरच्या विठोबाला वारकरी विष्णूचा अवतार मानतात. म्हणून ते स्वत:ला वैष्णव समजतात. त्यामुळेच महाएकादशीच्या दिवशी पंढरपुरला अलोट गर्दी होते
महाएकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घ्यायचेच अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. त्यासाठी त्यांची पायी वारी सुरू होते. आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून तुकाराम महाराजांची तर पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी अशा अनेक पालख्या पंढरपुरात येऊन पोहोचतात आणि चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठलभक्तीचा उमाळा दाटून येतो. महाराष्ट्रात वारकरी पंथाला फार मोठे महत्त्व आहे.
ज्ञानेश्वर-तुकोबादि संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पारमार्थिक लोकशाहीची स्थापना केली.’सर्व भूतांवर दया करा. संसार टाकू नका, फळाची अपेक्षा न करता कर्म करा, परस्परांवर प्रेम करा, अंध-अपंगांना मदत करा आणि वैयक्तिक चारित्र्य जपा’ असा संदेश वारकरी संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे समतेचे, ममतेचे आणि मानवतेचे व्यासपीठ आहे आणि याची साक्ष आषाढी एकादशीच्या दिवशी भरणाऱ्या पंढरपुरातील यात्रेच्या दिवशी मिळते. ज्या विठ्ठलभक्तांना पंढरीची वारी करणं जमत नाहीते आपल्या परिसरातील विठ्ठलाचे दर्शन घेतात.
प्रतिपंढरपुर म्हणून ओळखली जाणारी अनेक विठ्ठलमंदिरे महाराष्ट्रात आहेत. त्यातली पुणे शहरातील विठ्ठलवाडी येथील मुठा नदीच्या तीरावरील विठ्ठल- मंदिर आणि मुंबईतील चेंबूरचे विठ्ठलमंदिर प्रसिद्ध आहे.