शब्दप्रधान गायकी – गझल
गझल हा अतिशय सुंदर असा काव्यप्रकार आहे. पूर्वी फक्त गायकीपुरता मानला जायचा. मात्र, एकाच वृत्तातील दोन-दोन ओळींच्या अनेक कवितांची ही गुंफण असते. वृत्ताबरोबरच ती ओळखली जाते – प्रत्येक शेरातल्या दुस-या ओळीतील शेवटचा शब्द म्हणजे ‘रदीफ’ आणि त्याआधी येणारा, स्वरसाम्य असलेला यमकयुक्त शब्द ‘काफिया’ या शब्दांनी. पण हे झाले तंत्र. ती ख-या अर्थाने ओळखली जाते, तिच्या आशयसंपन्नतेने. दोन ओळींचा एकेक शेर आपल्याला एकेक प्रत्यय अगदी प्रभावीपणे आणि परिपूर्णतेने उलगडून सांगतो.
गझलकाराला गझल लिहिता आली पाहिजे, तशी ती गायकाला ’पोचवता’ही आली पाहिजे. शेर कसा असतो, दोन ओळींचा ‘राब्ता’ म्हणजे काय, त्यातून रसिकाला आशयदर्शन कसे होते, भिन्न आशयांच्या शेरांच्याही माध्यमातून गझल ‘जिवंत’ कशी होते – याही गोष्टी गायकाला अवगत असल्या पाहिजेत. मुशायऱ्यामध्ये गझल ‘ऐकवण्याची’ जशी कुशलता गझलकाराला माहीत असावी, त्याचप्रमाणे मराठी रसिकाला गझल, केवळ कविता वा गीत म्हणून नव्हे, तर गझल म्हणून ऐकण्याची सवय लावण्यासाठी आणि गझलेचा श्रोता, रसिक जाणकार तयार करण्यासाठी गझल गायकाच्या सादरीकरणाची शैली विकसित झाली पाहिजे. त्यासाठी, तिचे व्याकरणहि गायकाने समजून घेतले पाहिजे.
हे व्याकरण आणि तंत्र सांगायचं कारण म्हणजे, ती गायलीदेखील तशीच गेली पाहिजे. आणि ऐकलीदेखील तशीच पाहिजे. तिच्या शेरांतील (प्र)भाव पूर्ण व्यक्त झाला, तरच ती गझल आणि तिची गायकी यशस्वी मानली जाते. वृत्त महत्वाचे असल्यामुळे शब्दांच्या मर्यादा असतात. शब्दांची अशी काही रचना केलेली असते, की शेर संपतो तेव्हा एका अनुभवाचा, प्रत्ययाचा, विचाराचा साक्षात्कार होतो. शब्दांची जशी प्रभावी रचना अपेक्षित असते, तशी स्वरांचीही मांडणी त्यामुळे महत्वाची ठरते. नेमका कोणत्या शब्दावर कसा भर दिला, म्हणजे हा साक्षात्कार होईल, याची जाण ज्या गझलगायकाला असते, तोच तिला यशस्वी करू शकतो. इथे गझलरचनेत एका बाजूला तंत्र / व्याकरण आणि दुस-या बाजूला आशय यांचा मिलाफ होणे जितके आवश्यक, तितकेच गझलगायकीत शब्द आणि स्वर यांची पूरक वीण महत्वाची असते. त्यामुळे प्रत्येक शब्द महत्वाचा ठरतो. म्हणून तिची गायकीही नुसती स्वरप्रधान नसून, ती शब्दप्रधान गायकी असते.
गझल ऐकताना काही गोष्टी ध्यानात घेतल्या, तर तिचा आशय अक्षरश: धक्क्यासारखा प्रतीत होतो.
- गझलेची ‘जमीन’ (म्हणजे तिचा आकृतीबंध, तिचे वृत्त, व्याकरण अशा बाबी) पहिल्या शेरात स्पष्ट होते. तिची लय कशी असेल ते ठरते.
- शेवटचा यमक साधणारा शब्द किंवा शब्दसंच ‘रदीफ’ आणि त्याअगोदर येणारा प्रत्येक दुस-या ओळीतला स्वरसाम्य असलेला शब्द म्हणजे ‘काफिया’ आपल्याला त्या लयीची वाट दाखवून देतात.
- प्रत्येक दोन ओळींच्या छोट्या-छोट्या आशयसंचांतून काय प्रतीत होते, ते ऐकले पाहिजे.
- त्या दोन ओळींच्या संचांचा एकमेकांशी संबंध असतोच असे नाही. प्रत्येक दोन ओळींचा एकेक संच एकेक पूर्ण विचार असतो. आपली दाद त्या दोन-दोन ओळींच्या संचांनाच द्यायची असते.
- सहसा पहिल्या ओळीत जे मांडले जाते, त्याचा प्रभावी समारोप किंवा उपसंहार दुस-या ओळीच्या शेवटी मांडला जातो. गझलकार आणि गझलगायक या दोघांचेही कसब इथेच लागते. मात्र, त्यांचे ते कसब परिपूर्ण झाले, की त्यानंतरची जबाबदारी ही रसिकाची असते. ती दाद देण्याची. त्यासाठी, रसिकही जाणकार असावा लागतो.
रसिकही नुसता गझलेच्या तंत्र आणि आशयातच नव्हे, तर जीवनानुभवात पारंगत असला, तर गझल जीवनानंद देते.
आपल्याकडे गझललेखनाची परंपरा फार मोठी आहे. अभ्यासक तर नामदेव, अमृतराय, मोरोपंत, माणिकप्रभू यांचे उल्लेख करतात. शिवाय, जवळजवळ सर्वच गीतकार, कवींनी गझललेखन केले आहे. साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, आनंद बक्षी, नीरज अशांची नावे त्यात अधिक ठळकपणे घेता येतील. (अनेक नामोल्लेख स्थळमर्यादेमुळे टाळले आहेत.) मराठीत माधव ज्युलियन, सुरेश भट ही नावे सर्वांत महत्वाची. (सुरेश भटांची ‘मलमली तारुण्य माझे’, ‘मालवून टाक दीप’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’, ‘केव्हातरी पहाटे…’, ‘पहाटे पहाटे मला जाग आली’, ‘पूर्तता माझ्या व्यथेची…’ ही लोकप्रिय गाणी, गाणी नसून गझलाच आहेत.
त्याचप्रमाणे आपल्याकडे गझलगायकीची फार मोठी परंपरा आहे. तशीच प्रतिभासंपन्न अशा गझलगायकांची मांदियाळी आहे. जुन्या बेगम अख्तर, मेहदी हसन, नुसरत फतेह अली खान, शंकर-शंभू यांसारख्या असंख्य दिग्गज अभिजात गायकांपासून ते नंतर जगजीतसिंह-चित्रासिंह, गुलाम अली, पंकज उधास, राहत फतेह अली खान इ. आणि मराठीत भीमराव पांचाळे, सुधाकर कदम, दत्तप्रसाद रानडे, वैभव जोशी, महेन महाजन या अगदी अलिकडच्या गायकांपर्यंत सर्वांनीच या गायकीत आपापले प्रचंड योगदान दिले आहे. चित्रपटांतूनही सुरैय्या, नूरजहाँ, तलत महमूद, मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, भूपेंद्र, आशा, लता अशा सर्वांनीच गझल प्रसिद्ध केली आहे. पैकी सुरैय्या, नूरजहाँ, तलत महमूद, मोहमद रफी यांचे या प्रकारावर विलक्षण प्रभुत्व आहे.
- © प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर
- email : drsantoshkulkarni32@gmail.com