जाते फिरणे जरी थांबले तरी छताचा.. पंखा फिरतो
घर गळतीला आले आहे तरी घराचा.. पंखा फिरतो
मान उचलली जाते जेव्हा दबल्या पिचल्या झोपडीतली
माडी मधल्या उमरावांच्या उपकाराचा पंखा फिरतो
एक लेखणी तोफ होऊनी धक्का देते जर सत्तेला
शांत कराया त्या तोफेला सत्काराचा पंखा फिरतो
काय अचंबा करतो वेड्या ही दुनिया जर खोटी आहे
खरे वागणे असल्यावरती कुठे सुखाचा पंखा फिरतो ?
मावळतीला झुकल्यावरती तो उदयाची कथा सांगतो..
दोनच पेले झाल्यावरती हल्ली त्याचा पंखा फिरतो
– चेतन सैंदाणे