शांत होता दाट होता म्लान होता घोळका
जळत होता शेवटीचा एक शायर बोलका
एकदाही वाटलो नाही कुणा माणूस मी
धोंड होतो दगड होतो तर कधी मी ओंडका
सोडला मी श्वास जेव्हा लेक माझी बोलली
होत नसतो रे कुणावाचून कोणी पोरका
यायचे आहे तुला पण मी सखे विसरू कसे
काजव्याची होत नसते ना नभाची तारका
फाटते आभाळ जेव्हा देह मी करतो सुई
ओवतो दोरा म्हणूनी जन्म माझा फाटका
– चेतन सैंदाणे