कुठे एकटी तीच रडणार आहे
तिच्या आत मी रोज जळणार आहे
कसा आळ घेऊ तुझ्या वर्तनावर.?
गुन्हेगार जर मीच ठरणार आहे
उगा मान वळवून का पाहते ती
पुढे पाय जर ती उचलणार आहे
दगा जो दिला मी किती नेक होता
तुला हे कधी का समजणार आहे
नको भेट घेऊस आता कधीही
असेही नवे काय घडणार आहे
मला काय देशील स्वप्नात दर्शन
सुखाने इथे कोण निजणार आहे
जगातून वेडा गझलकार गेला
उद्या बातमी हीच असणार आहे
– चेतन सैंदाणे