काळजाला काळजीने पोखरावे रोज थोडे
हा तिचाही हक्क आहे, हे स्मरावे रोज थोडे
(मी तसा आहे सहिष्णू, देत आलो वाव म्हणुनी…
मानभावी जीवनाने का मरावे रोज थोडे…?)
चंद्र आणिक चांदणेही आपल्या नशिबात नाही
आपले आभाळ आहे… पांघरावे रोज थोडे
ह्या धरेचे अंथरुणही खास नाही एकट्याचे…
आपल्या वाट्यातले ते अंथरावे रोज थोडे
मैतरीचा कोणता हा कायदा आहे कळेना…!
वैर मित्रा कायद्याने का करावे रोज थोडे…?
जीवनाचा घाट हा अवघड तरीही फार नाही…
चालताना लागते पण सावरावे रोज थोडे
रोज घाई, धावपळही चालणारी ठीक आहे…
शांतवेळी काळजाशी वावरावे रोज थोडे
आसवांच्या ह्या अनावर सागराचा हा किनारा
राखण्यासाठीच कोणी आवरावे रोज थोडे
ऐकतो मी रोज माझ्या मुक्ततेचा फक्त नारा
लागते पण रीत म्हणुनी बावरावे रोज थोडे
- ©प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर
- email : drsantoshkulkarni32@gmail.com