वृत्तबद्ध कवितावृत्त – वनहरिणीमात्रावृत्त
– ८-८-८-८ एकूण मात्रा (३२)सौख्य –
वाटे घेउन रंग सुखाचे चित्र काढुया क्षितिजावरती
त्यातुन यावी भरभरून ती सोनछटांची सागरभरती
मधेमधे हे लुडबुड करती हलकेफुलके रुसवे फुगवे
पुन्हा नव्याने काळीज होते कोमल आणिक प्रेमळ हळवे
सहज पेलतो अनुबंधातुन संघर्षाचा वादळ वारा
साथ फुलवते निखळ निरागस विश्वासाचा मुग्धफुलो
रामनात डुलतो गृहसौख्याचा मकरंदी हा गोड ताटवा
कुठे गुंजतो हृदयकुपीशी हळूच येथे रोज पारवा
जपून ठेवत मधुर कडू त्या आठवणींचा मोरपिसारा
रेखत जावा आकाशाच्या नीलपटावर चांदणवारा
कोपऱ्यातले व्याकुळ क्षणही हसले होते धुंद सुखाला
खणसंदूकी उलगडतांना स्वप्न मिळाले आत तळाला
शब्द माळले वेचवेचुनी सप्तपदीचे आयुष्याला
दरवळतांना हिरवळतांना भाळी ल्यालो त्या वचनाला
मर्यादेतुन सावरलेले देव्हाऱ्यासम संसाराला
गुंफत गेलो नातेअपुले मोहक सुंदर क्षणाक्षणाला
जगण्यामध्ये त्याग समर्पण आयुष्याला जाते तारुन
उधळत जावे इंद्रधनुष्यी रंग बिलोरी आचारातुन
चक्र रथाचे पती नि पत्नी मयूरपंखी सुवर्णगाठी
तेवत राहो असे निरंतर दीप सुखाचे फुलण्यासाठी
– सौ.रंजना कराळे,