• Thu. Dec 19th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

AAIPAN / आईपण

ती निघाली,

आवरा आवर करुन घरातली, आवरून घेतलं तिने आपलं मन,

आणि पर्सच्या आतल्या कप्प्यात, जपून ठेवलं आईपण..

ती निघाली,

डोळ्यातलं पाणी आतल्या आत जिरवून,

मनाशी काही भक्कम अस ठरवून..

“आई” व्यतिरिक्त स्वतःची ओळख बनवायला,

आपल नवीन भविष्य घडवायला..

ती निघाली,

पण पाय उंबरठ्यापाशी अडलाच,

जीवाचा त्रागा घडलाच..

केवढा बोल लावला स्वतःला,

वेगळं अस्तित्व हवंय कशाला..

तू आई आहेस, आईच रहा ना,

दूरच स्वप्न दुरूनच पहा ना..

कशाला इवल्याश्या जीवाला त्रास,

आई असून नसल्याचा भास..

भरून आलेलं काळीज मग तिने दरवाज्यातचं सांडल,

स्वतःसमोरच स्वतःच स्पष्टीकरण मांडलं..

आणि ती निघाली..

इवल्याश्या हातांनी जेव्हा bye bye केलं,

कसं सांगेल मनात तेव्हा काय काय झालं..

गळ्यात अडलेला हुंदका, तिने तिथेच दडवला,

डोळ्यातला ओघळ डोळ्यातचं अडवला..

मन करुन घट्ट, तिने दार घेतलं लावून,

आणि पर्सच्या आतल्या कप्प्यात, आईपण दिलं ठेवून..

आणि ती निघाली…

© किर्ती हवालदार

kirti22hawaldar@gmail.com

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !